Skip to content Skip to footer
Loading Events

कलासक्त कल्चरल फाऊंडेशन आयोजित कार्यक्रमास रसिकांची मनमुराद दाद 

संगीतकाराच्या वेशातला गोष्टाड्या‌’ असे अभिरूप धारण करून कौशल इनामदार यांनी आपल्या सांगितीक जीवनाचा पट उलगडला. काही अनुभव, काही मिश्किल टिप्पणी तर विविध गीते सादर करून त्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. मी संगीतकार कसा झालो येथपासून, बालगंधर्व चित्रपटातील गीते तसेच मराठी अभिमान गीताच्या निर्मितीमागील कथाही त्यांनी रसिकांसमोर मांडली.
निमित्त होते कलासक्त कल्चरल फाऊंडेशनतर्फे आयोजित गप्पा, गोष्टी आणि गाण्यांवर आधारित ‌‘इनामदारी‌’ या कार्यक्रमाचे. एस. एम. जोशी सभागृहात रंगलेला हा कार्यक्रम रसिकांची मनमुराद दाद मिळवत गेला. सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांच्यासह चैतन्य गाडगीळ, अमेय ठाकुरदेसाई, सोमेश नार्वेकर यांचा या कार्यक्रमात सहभाग होता.
गोष्टीवेल्हाळता ही आपल्या देशाची ओळख असून या अद्भूत कथारम्य आवडीसह भारतीयांचा दुसरा छंद म्हणजे गाणे गुणगुणणे असे सांगून कौशल इनामदार म्हणाले, माझे आजोबा उत्तम व्हायोलिन वादक होते. ते या परदेशी वाद्यावर अभिजात शास्त्रीय संगीताचे सूर आळवित असत. आजोळी गेलेलो असताना रात्री त्यांच्या स्वरांच्या हिंदोळ्यावरच झोपेच्या आधीन होत असे आणि जागे होत असताना त्यांच्या सूरांची साथ लाभत असे. यातून माझ्यामध्ये संगीताची विशेष रूची निर्माण झाली.
युवावस्था मी गझलांच्या माहोलात वावरत असे. यातूनच छंदबद्ध लिखाणाचा प्रयत्नही केला आणि गीतकार होण्याची उर्मीही बाळगली.
स्वाभाविक चाल बनविणे म्हणजेच शब्दांचा आणि चालीचा जन्म एकाच वेळी झाला असवा अशी संगीत रचना करण्याकडे माझा कल होता. अशा गप्पांच्या मुशाफिरीत रसिकांना गुंगवून टाकतानाच कौशल यांनी ‌‘दया घना रे दया घना रे‌’, ‌‘घन आभाळीचा तडकावा‌’ तसेच गझलकार सुरेश भट, अरुण म्हेत्रे, अशोक बागवे आणि नलेश पाटील यांच्या गझला सादर करून मैफलीत रंग भरले.
संगीत सुचताना बारा स्वरांच्या मुशाफिरीतूचन निर्मिती होते असे सांगून इनामदार पुढे म्हणाले, संगीत रचना करताना साधर्म्य आणि सांगीतिक चोरी यामधील पुसटश्या रेषेचे भान असणे आवश्यक आहे. गायक, कवीला जसा रियाजाला किंवा विचारांला वेळ मिळू शकतो तसा संगीतकाराच्या रियाजाला वेळ उपलब्ध नसतो, असे सांगून एकाच गझलेला दोन वेगळ्या संदर्भांनी वेगवेगळी चाल कशी लावली याचेही सादरीकरण कौशल इनामदार आणि सोमेश नार्वेकर यांनी केले.
बालगंधर्व चित्रपटाच्या संगीत निर्मितीप्रसंगी ‌‘परवर दिगार‌’ या कव्वालीची निर्मिती का कराविशी वाटली आणि कशी केली हेही त्यांनी मनमोकळेपणाने रसिकांना सांगितले.
मराठी अभिमान गीताचे निर्मितीमागील कथा उलगडताना मराठी भाषिकांना मातृभाषेचा जाज्वल्य अभिमान पाहिजे, असे सांगून विविध प्रसंगांच्या रसभरीत वर्णनांनी प्रेक्षकांना भावविभोर केले.
प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष श्रीरंग कुलकर्णी यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती सांगितली. कलाकारांचा सत्कार श्रीरंग कुलकर्णी, विनिता आपटे, माधुरी वैद्य यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन गौरी बिडकर यांनी केले.

Some Moment Of Events